औरंगाबाद - औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन व एमईसीसी औरंगाबाद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी वरील मंथन या शनिवारी (ता. १७) एमजीएम संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय कार्यशाळेकडे महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह बहुतांश नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे समोर आले. १०० पेक्षा अधिक नगरसेवक असणाऱ्या महापालिकेतील बोटावर मोजण्याइतकेच नगरसेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यापासून सर्वत्र या योजनेचा गाजावाजा करणारे लोकप्रतिनिधी सर्वांचा नजरेस पडतात. परंतु शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी वरील कार्यशाळेत लोकप्रतिनिधींना याबद्दल किती गांभीर्य आहे हे दिसून आले. सकाळी दहा वाजता सुरू झालेले या चर्चासत्रासाठी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते. नगरसेवकांपैकी केवळ राजगौरव वानखेडे, माधुरी अदवंत, सुरेखा सानप, दिलीप थोरात, राहुल सोनवणे यांची उपस्थिती होती. महापौर-उपमहापौर आदींसह अनुपस्थित असलेले लोकप्रतिनिधी सभागृहात मात्र यावर मोठ्या तावातावाने बोलताना दिसतील, अशी चर्चा यावेळी रंगली होती. ही कार्यशाळा सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार असून स्मार्ट सिटी संदर्भात विविध विषयावर तज्ञ आपले विचार मांडणार आहेत. यावेळी महापौर यांच्याशी संपर्क साधला असता ते एका कार्यक्रमात असल्याचेे समजले.












